वादग्रस्त आरटीओ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?
ओव्हरलोड वाहनांना दिली जाणारी अर्थपूर्ण मोकळीक... अधिवेशनासह राज्यभरात गाजलेले पाटील प्रकरण.... परिवहन आयुक्तालय, पिंपरी चिंचवड व पुणे आरटीओ येथील अधिकाऱ्यांचा सहभाग... यासह परिवहन विभागातील तऱ्हेतऱ्हेच्या घटनांचा मागोवा घेणारी वृत्तमालिका प्रसिद्ध करीत आहोत. भाग - १
‘सचिन पाटील’ला नेमके कोणाचे अभय?
पुरावे, तक्रारी, लक्षवेधी असूनही अद्याप कारवाई नाही
प्रतिनिधी, पुणे
परिवहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक सचिन पाटील यांच्याविरोधात गंभीर स्वरूपाच्या तक्रारी असूनही अद्याप कोणतीही कारवाई न झाल्यामुळे, पाटील यांना नेमके कोणाचे संरक्षण लाभते आहे, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
वाहनांची तपासणी, ‘ओव्हरलोड’ ट्रकवर कारवाई न करणे, तसेच त्याआडून संगनमताने आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या अनेक तक्रारी पाटील यांच्याविरोधात करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या तक्रारी केवळ तोंडी नव्हे, तर व्हिडिओ आणि छायाचित्रांसह ठोस पुराव्यांच्या आधारे करण्यात आल्या आहेत. या प्रकाराची विधिमंडळ अधिवेशनातही गंभीर दखल घेतली गेली होती. आमदारांनी सभागृहात आवाज उठवून चौकशीची मागणी केली होती. मात्र, त्यानंतरही संबंधित अधिकाऱ्याविरोधात फक्त कागदी हालचाली झाल्या असून, प्रत्यक्षात कुठलीही ठोस कारवाई झालेली नाही.
काही वाहतूकदारांकडून महिन्याला पैसे घेतल्याचा आरोप पाटील यांच्यावर आहे, अशी माहिती अधिवेशनातही मांडण्यात आली होती. तरीही चौकशी थंडबस्तात गेली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांची गूढ भूमिका संशयास्पद ठरते आहे. ‘पाटील यांना वरून अभय आहे काय?’, असा सवाल आता नागरी आणि सामाजिक संघटनांकडूनही उघडपणे विचारला जात आहे.
............
परिवहन मंत्र्यांची डोळेझाक
सचिन पाटील या वादग्रस्त अधिकाऱ्याबाबत सातत्याने माध्यमातून प्रसिद्ध झाल्यानंतरही परिवहन मंत्री आणि परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकारी, त्याकडे डोळेझाक करीत असल्याचे दिसून येते.
.........