बापूसाहेब पठारेंचा भाजपला धक्का; 'तुतारी'वर लढणार असल्याची थेट घोषणा
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला (भाजपा) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने पुण्यात पहिला मोठा धक्का दिला आहे. भाजपाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी आपले निवडणूक चिन्ह ‘तुतारी’ असणार असल्याचे जाहीर करत प्रचाराला सुरूवात केली आहे.
पुणे: वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी भाजपला मोठा धक्का देत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेशाची घोषणाच करून टाकली आहे. गणेश मंडळांना भेटीगाठीचा कार्यक्रम सध्या सुरु असून, एका मंडळाच्या भेटीदरम्यान उपस्थितांना आपण निवडनूक 'तुतारीकडून लढणार असल्याचे' सांगितले.
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला (भाजपा) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने पुण्यात पहिला मोठा धक्का दिला आहे. भाजपाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी आपले निवडणूक चिन्ह ‘तुतारी’ असणार असल्याचे जाहीर करत प्रचाराला सुरूवात केली आहे. वडगाव शेरीचे माजी आमदार असलेल्या पठारे सध्या भाजपात आहेत, मात्र आगामी निवडणुकीसाठी त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाशी जवळीक साधण्याची चर्चा सुरू होती. शनिवारी गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी त्यांनी ‘तुतारी’ चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे मंडळांना भेट देताना स्पष्ट केले. त्यांचा कार्यकर्त्यांना उद्देशून केलेला एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात त्यांनी ‘तुतारी’ चिन्हासाठी मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
बापूसाहेब पठारे वडगाव शेरी मतदारसंघातून आगामी निवडणुकीसाठी इच्छुक असून, महायुतीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांशी संपर्क साधल्याची चर्चा होती. त्याला आता खुद्द पठारे यांनी दुजोरा दिला आहे.
दरम्यान त्यांचे सुपुत्र सुरेंद्र पठारे हे भाजप प्रदेश पातळीवर पदाधिकारी आहेत. त्यांची भूमिका काय राहणार याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.