'एक पेड माँ के नाम’ अभियानाचा शुभारंभ

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून प्रत्येकाने आपल्या आईच्या नावाने एक झाड लावावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना केले. राज्यातील सर्व महापालिकांनी त्यांच्या हद्दीत एक लाख झाडे लावण्याचे निर्देश दिले आहेत, आणि या निर्देशांनुसार सर्व महापालिका वृक्षारोपण करत आहेत.

'एक पेड माँ के नाम’ अभियानाचा शुभारंभ
Eknath Shinde in Thane

पर्यावरणाचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात ‘एक पेड माँ के नाम’ अभियानाच्या उद्घाटन समारंभात केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून प्रत्येकाने आपल्या आईच्या नावाने एक झाड लावावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना केले.

ठाणे महानगरपालिका, महाराष्ट्र वन विभाग, ग्रीन यात्रा आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मुख्यमंत्री हरित ठाणे एक लक्ष वृक्ष लागवड’ या अभियानांतर्गत ‘एक पेड माँ के नाम’ या मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, लोकमान्य नगर येथे वृक्षारोपण करून झाला. या प्रसंगी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक आणि इतर मान्यवर उपस्थित होते. ठाणे महापालिकेने आतापर्यंत ६१ हजार झाडे लावून सर्वाधिक वृक्षारोपण केले आहे, याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आयुक्त सौरभ राव यांचे विशेष कौतुक केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या "मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण" या योजनेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, या योजनेचे हप्ते महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे लोकमान्य नगरमधील महिलांनी मुख्यमंत्र्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला.