मोदींनी अनावरण केलेला शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यातच कोसळला; शिवप्रेमींचा संताप

नौसेना दिनानिमित्त मालवण येथील राजकोट किल्ल्यावर नौसेनेतर्फे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा आज सोसाट्याच्या वाऱ्याच्य तडाख्यात कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पुतळा उभारून केवळ आठ महिन्याच्या कालावधीत पुतळा कोसळल्याने या कामाच्या दर्जावर यावेळी शिवप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मोदींनी अनावरण केलेला शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यातच कोसळला; शिवप्रेमींचा संताप
Chhatrapati shivaji maharaj statue inaugurated in Sindhudurg

नौसेना दिनानिमित्त मालवण येथील राजकोट किल्ल्यावर नौसेनेतर्फे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा आज सोसाट्याच्या वाऱ्याच्य तडाख्यात कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या पुतळा कोसळल्याचे कळताच मालवण मधील तमाम शिवप्रेमी नागरिक व राजकीय पुढाऱ्यांनी राजकोट येथे धाव घेतली. पुतळा उभारून केवळ आठ महिन्याच्या कालावधीत पुतळा कोसळल्याने या कामाच्या दर्जावर यावेळी शिवप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच आम. वैभव नाईक यांनीही तातडीने राजकोट येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी आम नाईक यांनी शिवपुतळ्याच्या निकृष्ठ कामाबाबत नाराजी व्यक्त करीत छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता असून त्यांचा पुतळा निकृष्ट कामामुळे कोसळल्याने अतीव दुःख होत असून याचा आम्ही निषेध करतो. या कामाचे ऑडिट होऊन निकृष्ट काम केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी आम. नाईक यांनी केली.

मालवणात आज पावसाचा जोर असताना दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्याने तडाखा दिला. याच वादळी वाऱ्यात राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पूर्णतः कोसळला.ही घटना समजताच शिवप्रेमींनी त्याठिकाणी धाव घेतली.

याबाबत कळताच मालवण पोलिसांनी देखील धाव घेत त्याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बंदोबस्त ठेवत किल्ल्याचा दरवाजा बंद करून जमलेल्या नागरिकांना प्रवेश नाकाराला. यावेळी स्थानिक नागरिकांकडून पुतळ्याचे अवशेष कापडाने झाकून ठेवण्यात आले. यावेळी जमलेल्या नागरिकांनी पुतळ्याच्या बांधकामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत त्यामुळेच शिवरायांचा पुतळा कोसळण्याची दुर्दैवी वेळ आल्याची भावना व्यक्त केली. नौसेना दिनानिमित्त घाई गडबडीत उभारण्यात आलेल्या राजकोट किल्ला तसेच तसेच पुतळ्याच्या कामाबाबत वारंवार तक्रारी येत असताना त्याकडे दुर्लक्ष केले गेले, त्यामुळे आज ही नामुष्की उद्भवली अशा प्रतिक्रिया देखील व्यक्त झाल्या. यावेळी शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज की जय.. अशा घोषणा देत प्रशासन व सरकारचा निषेध व्यक्त केला. यावेळी राजकीय मंडळींनी देखील राजकोट येथे धाव घेतली. आम. वैभव नाईक यांनी याठिकाणी दाखल होत पाहणी करून प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. नित्कृष्ट कामामुळेच ही वेळ ओढवली असून प्रशासनाने तात्काळ गुन्हे दाखल करावेत, अशा सूचना आमदारांनी दिल्या. तसेच या कामाची चौकशी व स्ट्रॅक्चरल ऑडिट झाले पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.